Thursday, February 24, 2011

पाण्याचे महत्त्व समर्थ कसे पटवतात ?

मनुष्याच्या जीवनात पाण्याचे महत्व कोणते ?

सजीवाची निर्मिती पाण्यात झाली .जीव पाण्यावाचून राहू शकत नाही .म्हणून पाण्याला आपोनारायण

म्हणतात .या पाण्याचा साठा कोठे कोठे आढळतो याचे वर्णन या संपूर्ण समासात समर्थ करतात .हे

बघून समर्थांची निरीक्षण शक्ती किती प्रगल्भ होती याबद्दल अचंबा वाटतो .

पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे .पृथ्वीवर सात समुद्रांचे पाणी आहे .पावसाचे पाणी नद्यांमधून

वहात जाउन समुद्राला मिळते ।नद्या कमी जास्त लांबीच्या असतात ।नद्या पर्वतावर उगम पावतात

,धबधब्याने वाहतात .आड ,विहिरी ,सरोवरे ,यांचे प्रचंड जलाशय असतात . गायमुखे ,पाट,कालव्यातून

पाणी वाहते ।झरे झिरपतात.पर्वत फुटून जलाशय तयार होतात .झरे ,ओढे ,कारंज्यासारखे पाणी

उडते .डोह ,डबकी ,लहान टाकी मोठी टाकी ,असे जलाशय डोंगरात आढळतात .

तीर्थात पवित्र ,पुण्यकारक असते ।तीर्थांचे पाणी पुण्यकारक असते ।अनेक ठिकाणी पाणी थंड

असते ,अनेक ठिकाणी गरम असते ।सर्व प्रकारच्या वेलींमध्ये ,फळांमध्ये ,फुलांमध्ये पाणी

असते .कंदमुळांमध्ये गुणकारक पाणी असते .खारे ,गोडे ,विषारी ,मधुर पाणी असते .अनेक

प्रकारचे उसाचे रस ,फळांचे रस ,गोरस ,मादक रस पारद रस काकवी ,गुळवणी हे गुळाचे रस

अशा अनेक प्रकाराने पाणी ह्या सृष्टीत आढळते .

निरनिराळ्या मोत्यांना पाणी असते .रत्नांचे पाणी झळकते .हत्यारांना पाणी देतात .रक्त ,रेत ,लाळ,मूत्र

,घाम ही पाण्याचीच रूपे .देह ,पृथ्वी पाण्यापासून झाले आहेत .सूर्यमंडळ ,चंद्रमंडळ सुध्दा

पाण्यापासून झाले आहेत .

खारा समुद्र ,दुधाचा समुद्र ,दारूचा समुद्र ,तुपाचा समुद्र ,दह्याचा समुद्र , उसाच्या रसाचा समुद्र ,

शुध्द गोड पाण्याचा समुद्र असे सगळीकडे पाणी पसरलेले असते ।आपले शरीरही पाण्यापासून तयार

झाले आहे .त्यानंतर ही शरीराला पाणी लागतेच .पाणी माणसाला अनेक प्रकारे सुख देते .

समर्थ सूर्य स्तवन का करतात ?

पृथ्वीवरील सजीव सृष्टी साठी सूर्याचे महत्व फार आहे .त्याच्या शिवाय एकही दिवस सजीव जगू शकत

नाहीत .त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत .सूर्य उगवला की प्राण्यांचा दिवस सुरु होतो .

नाना धर्म नाना कर्मे | उत्तमे मध्यमे अधमे | सुगमे दुर्गमे नित्यनेमे | सृष्टीमध्ये चालती ||१६-२-४ ||

वेदशास्त्रे आणि पुराणे | मंत्र यंत्र नाना साधने | संध्या स्नान पूजा विधाने | सूर्येवीण बापुडी ||१६-२-५ ||

सूर्य प्रकाशाने सर्व प्राण्यांना उजाडते .उत्तम ,मध्यम ,अधम ,सुगम ,दुर्गम ,असे अनेक धर्म ,अनेक कर्म

जगात चालतात ।वेद ,शास्त्र ,पुराणे ,मंत्र ,यंत्र ,साधने ,संध्या स्नान ,पूजा या सर्व गोष्टी सूर्यावर

अवलंबून असतात .

प्रापंचिक आणि पारमार्थिक |कार्य करणे कोणी येक | दिवसेवीण निरर्थक | सार्थक नव्हे ||१६-२-७ ||

प्रापंचिक पारमार्थिक कोणतेही कार्य दिवसा उजेडी च करावे लागते .

सूर्याचे मानवी जीवनात महत्व कोणते ?

सूर्याचे अधिष्ठान डोळे | डोळे नसता सर्व आंधळे |याकारणे कांहीच न चले | सूर्येवीण ||१६-२-८ ||

म्हणाल अंध कवित्वे करिती | तरी हेही सूर्याचीच गती | थंड जालिया आपुली मती | मग मती प्रकाश कैचा ||१६-२-९ ||

प्राणिमात्रांच्या डोळ्यामध्ये सूर्याचे अधिष्ठान असते .डोळे नसतील तर आंधळेपणा येतो .त्यामुळे

सूर्याशिवाय कांहीच चालत नाहीत .आंधळी माणसे काव्य रचना करत असली तरी तो देखील सूर्याचाच

प्रभाव आहे । सूर्याचा प्रकाश उष्ण असतो .जगामध्ये हरीहाराचे पुष्कळ अवतार झाले .पण त्यांच्याही

आधी सूर्य होता आणि आताही आहे .म्हणजे सूर्य सर्वांपेक्षा वडील आहे .सूर्य विश्वाचा डोळा आहे .

म्हणून तो श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे .

सकळ दोषाचा परिहार | करितां सूर्यास नमस्कार | स्फूर्ती वाढे निरंतर | सूर्यदर्शन घेता || १६-२-२२ ||

सूर्याला नमस्कार केला की सर्व दोष नाहीसे होतात .सूर्यदर्शन घेतल्याने स्फूर्ती निरंतर वाढते .

म्हणून समर्थ सूर्य स्तवन करतात .

पृथ्वी स्तवन


श्री समर्थ पृथ्वी स्तवन का करतात ?

सगळे जीव पृथ्वीच्या आधाराने जगतात ,देह पृथ्वी तत्वाचा बनला आहे .देहाला पृथ्वी शिवाय आधार

नाही। आकाशात राहणा-या ,उडणा-या पक्षानाही पृथ्वीचाच आधार असतो ,कारण त्यांचा देह पृथ्वी

तत्वाचा बनलेला असतो. पृथ्वीला माता म्हणतात .पण ह्याच पृथ्वीलाच लोक माता म्हणतात .ह्याच

पृथ्वीला लोक जाळतात, पोळतात, खणतात ,पोळतात ,नांगरतात .तिच्यावर लोक ,प्राणी ,पक्षी मलमूत्र

टाकतात ।तरीही पृथ्वी माता तिच्या ह्या लेकरांवर रागवत नाही .ती त्यांच्या अन्न ,वस्त्र ,निवा-याची

सोय करते ।

पृथ्वीच्या पोटात धातू ,द्रव्ये असतात .देव ,दानव ,मानव ,किल्ले ,शहरे ,गड कोट ,गावे शहरे

अनेक देश ,या पृथ्वीवरच आहेत .मेरू , मंदार ,हिमालय असे पर्वत ,अनेक पक्षी ,मासे ,साप

असे अनेक प्राणी पृथ्वीवरच राहतात . पृथ्वी भोवती असलेले आवर्णोदक इतके अपार आहे की

त्याचा अंत लागत नाही .त्यात प्रचंड शरीराचे जलचर प्राणी आहेत .या आवरणोदकाला वायूचा

आधार आहे .वायू गहन ,दाट ,घट्ट ,आहे .म्हणून ते पाणी कोणत्याही बाजूने वाहून जात नाही .

अशा अनेक गोष्टी पृथ्वीवर आहेत .म्हणून समर्थ म्हणतात :

बहुरत्न हे वसुंधरा | ऐसा पदार्थ कैचा दुसरा | अफाट पडिले सैरावैरा | जिकडे तिकडे ||१६-३-२० ||

म्हणून या पृथ्वीला समर्थ वसुंधरा म्हणतात .पृथ्वी सारखा दुसरा पदार्थ नाही .

वाल्मिकी स्तवन

श्री समर्थ वाल्मिकी स्तवन का करतात ?

साधकांसाठी वाल्मिकी चरित्र अत्यंत महत्वाचे आहे त्यांची नामनिष्ठा ,त्यांची उपरती ,त्यांचा अनुताप

आणि त्यांची तप:श्चर्या साधकांसाठी आदर्श आहे .ह्या चारही गोष्टी समर्थांनी वाल्मिकी स्तवनात

सांगीतल्या आहेत .

वाल्मिकी नामाने कसा तरला ?

पूर्वी केली दृष्ट कर्मे | परी पावन झाला रामनामे | नाम जपता दृढ नेमे | पुण्ये सीमा सांडिली ||१६-१-८ |

उफराटे नाम म्हणता वाचे | पर्वत फुटले पापाचे | ध्वज उभारले पुण्याचे | ब्रह्मांडावरुते || १६-१-९ ||

वाल्मीके जेथे तप केले | ते वन पुण्य पावन झाले | शुष्क काष्ठी अंकुर फुटले |तपोबळे जयाच्या ||१६-१-१० ||

|पूर्व आयुष्यात वाल्मिकीने दुष्ट कर्मे केली पण उरफाटे रामनाम दृढतेने घेउन तो पवित्र झाला .पापांचा

नाश झाला. पापाचे पर्वत फुटले .पुण्याचे निशाण फडकले .त्याने ज्या वनात तप केले ते वन सुध्दा

इतके पवित्र झाले की कोरड्या लाकडाला अंकुर फुटला .

उपरती आणि अनुताप | तेथे कैचे उरेल पाप |देह्यांत तप पुण्यरूप | दुसरा जन्म जाला ||१६-१-१२ ||

त्याला उपरती झाली .पश्चात्ताप झाला .पाप उरले नाही .अखंड तप केल्यामुळे पुण्यरूप असा दुसरा

जन्म झाला.

अनुतापे आसन घातले | देह्यांचे वारूळ जाले | तेची नाम पुढे पडिले | वाल्मिक ऐसे || १६-१-१३ ||

पश्चात्ताप झाला ,आणि आसन घालून जप करायला बसला .,इतक्या दृढतेने जप करू लागला की

देहाभोवती वारूळ वाढले म्हणून लोक त्याला वाल्मिकी म्हणू लागले .

वाल्मिकीने केलेले कार्यही खूप मोठे आहे .

जो तापसांमध्ये श्रेष्ठ | जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ | जयाचे बोलणे स्पष्ट | निश्चयाचे ||१६-१-१५ ||

जो निष्ठावंताचे मंडण | रघुनाथ भक्तांचे भूषण | ज्याची धारणा असाधारण |साधका सुदृढ करी ||१६-१-१६

वाल्मिक ॠशी बोलिला नसता| तरी आम्हांसी कैसी रामकथा | म्हणोनिया समर्था | काय म्हणोन वर्णावे ||१६-१-१८ ||

वाल्मिकी तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ आहे .कविगणांमध्ये वरच्या दर्जाचा आहे .त्याची नामनिष्ठा असाधारण

आहे ।रामभक्तीचे भूषण आहे ।त्याची धारणा विलक्षण आहे ।निश्चयाचे बोलणे आहे ।तो निष्ठावंतां

मध्ये शोभून दिसतात , अशा वाल्मिकीने जर रामकथा सांगितली नसती तर आज आपल्याला रामकथा

ऐकायला मिळाली नसती ।.ती रामकथा इतकी अद्वितीय आहे की देव ,मानव ,दानव सर्वांना ती हवी

आहे।शतकोटी रामायणाचे तीन भाग करून शंकरानी देव ,दानव व मानव या तिघांना सारखी वाटली

।उरलेली दोन अक्षरे राम ही आपल्या कंठात धारण केले .

या सर्व गोष्टींमुळे वाल्मीकींचे स्तवन !

पिंडाची उत्पत्ती कशी होते ?

पिंडाची उत्पत्ती कशी होते ?

तत्वांचे शरीर जाले | अंतरात्म्यासगट वळले | त्यांचे मूळ जो शोधिले |तो उदकरूप ||१५-९-२ ||

शरत्काळींची शरीरे |पिळेपिळो झिरपती नीरे | उभये रेतें येकत्रे |मिसळती नेत्री ||१५-९-३ ||

अन्नरस देहरस | रक्तरेते बांधे मूस | रसद्वये सावकाश | वाढो लागे ||१५-९-४ ||

वाढता वाढता वाढले | कोमळाचे कठीण जाले | पुढे उदक पैसावले | नाना अवेवी ||१५-९-५ ||

आदिजीवाची [प्रथम सजीवाची ] उत्पत्ती पाण्यातच झाली .मानवी शरीर त्रिगुण ,पंचभूते व अंतरात्मा मिळून बनलेले आहे .सर्वांच्या मुळाशी पाणीच असते .मानवी शरीर स्त्री पुरुषाची रेते रक्तात एकत्र मिसळून तयार होते .रक्त रेताच्या संयोगाने अन्नरस व देह रस मिळून मूस म्हणजे पिंड तयार होते .पिंड हळूहळू वाढू लागतो .

सर्व सजीवांचे मूळ कोण ?

झाडाचे उदाहरण घेतले तर असे दिसते की फळाहून फुल वडील आहे .फुलाहून पान ,पानाहून लाकडे वडील आहेत .लाकडाहून बारीक मुळ्या ,मुळ्याहून पाणी वडील आहे ,पाणी घट्ट बनते .आणि पृथ्वीवर अनेक पिंड आढळतात .पृथ्वीपेक्षा आप ,पाण्यापेक्षा अग्नी ,अग्नी पेक्षा वायू ,वायू पेक्षा अंतरात्मा श्रेष्ठ आहे .म्हणजेच सर्व सजीवांचे मूळ अंतरात्मा आहे .

अंतरात्म्याची उपासना केल्यावर काय होते ?

म्हणौन सकळा वडील देव | त्यासी होता अनन्यभाव | मग हे प्रकृतीचा स्वभाव | पालटों लागे ||१५-९-२०||

करी आपुला व्यासंग | कदापी नव्हे ध्यान भंग | बोलणे चालणे वेग |पडोची नेदी ||१५-९-२१ ||

तो वडील जेथे चेतला | तोचि भाग्यपुरुष जाला | अल्प चेतने तयाला |अल्पभाग्य ||१५-९-२२ ||

तया नारायेणाला मनी | अखंड आठवावे ध्यानी | मग ते लक्ष्मी तयापासूनि || जाईल कोठे ||१५-९-२३ ||

नारायेण असे विश्वी | त्याची पूजा करीत जावी | याकारणे तोषवावी | कोणी तरी काया ||१५-९-२४ ||

अंतरात्मा प्रत्येकाच्या जवळ असतो .,तरीही कोणीही त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत नाही .त्याचा अनुभव घेण्याची तहान कोणाला नसते .म्हणून सगळ्यात जो श्रेष्ठ त्या अंतरात्म्याशी अनन्य व्हावे .असे समर्थ सांगतात .अंतरात्म्याशी अनन्यपण साधलेला पुरुष त्याचा नित्याचा व्यवसाय करतो ,पण व्यवसाय करत असताना त्याचा ध्यानभंग होत नाही .त्याचे अनुसंधान चुकत नाही .त्याच्या बोलण्या वागण्यात ही काहीही दोष ,कमीपणा ,विपरीत पणा दिसत नाही .जेव्हा तो वडील अंतरात्मा अंत :करणात जागा होतो ,तेव्हा तो भाग्यपुरुष बनतो .म्हणून त्या अंतरात्मा रूपी नारायणाला मनात अखंड आठवावे .त्यामुळे लक्ष्मी त्याच्या पासून दूर जात नाही .अंतरात्मा विश्वात व्यापून असल्याने त्याच्याशी अनन्य होताना आपले मन विश्वरूप होते .

त्या अंतरात्म्याची उपासना कोणती ते पाहू गेल्यास असे दिसते की आपण एखादा जीव संतुष्ट केला तर देहाला केलेले अंतरात्म्याला पोहोचते .अंतरात्मा संतुष्ट होतो .कोणाचेही अंत:करण नं दुखावता ,भेटेल त्याला आपलेसे करणे ,आपलेसे म्हणणे ही उपासनेची दोन चिन्हे आहेत .

अंतरात्माच अंतरात्म्याचा खेळ पाहू शकतो .जेव्हा आपण अंतरात्म्याशी तदाकार होतो ,तेव्हा आपण विश्वाशी तदाकार होतो .ही उपासना उपासकाला मूळमायेच्या पलीकडे निरंजना पर्यंत पोहोचवतो .

उपासना करून अंतरात्म्याचा शोध करून सारे अशाश्वत शाश्वत रूप दिसू लागते .उपासक व उपास्य हां भेदभाव मावळतो .अज्ञान ,ज्ञान या अवस्था जावून वृत्तीशून्यता येते .चंचळाच्या अंमलातून मुक्तता मिळते .

शक्तीपात म्हणजे काय ? तो कोण करतो ?

अज्ञान शक्ती निरसली | ज्ञान शक्ती मावळली | वृत्ती सुन्ये कैसी जाली |स्थिती पहा ||१५-१०-१२ ||

मुख्य शक्तीपात तो ऐसा | नाही चंचळाचा वळसा | निवांती निवांत कैसा |निर्विकारी ||१५-१०-१३ ||

चंचळाची विकार बालटे | ते चंचळचि जेथे आटे | चंचळ निश्चळ धनवटे | हे तो घडेना ||१५-१०-१४ ||

जेथे अंतरात्म्याचा अनुभव येतो ,तेथे दृश्य पदार्थ मुळीच नसतात .अज्ञान ,त्याचे भ्रम नाश पावतात .याचे

ज्ञान ,परिणाम नाश पावतात .वृत्ती शून्य होउन केवलपणा उरतो .म्हणजेच जीव चंचळाच्या चक्रातून बाहेर

येतो .यालाच शक्तीपात म्हणतात .

चंचळाच्या चक्रातून सुटून जीव परमात्मस्वरूप स्वरूप होतो ,निर्विकारी स्वरूपात स्थिर होतो .हे काम फक्त

सद्गुरुच करू शकतात .सद्गुरू म्हणजे प्रचंड अध्यात्मिक शक्ती असलेले एक केंद्रच असते .सद्गुरू आपली

शक्ती शिष्याला दर्शन ,स्पर्शन ,भाषण ,स्मरण ,संकल्प ,आज्ञा ,स्वप्न अशा अनेक मार्गांपैकी एका मार्गाने

देतो . कोणत्या साधकाला कोणत्या मार्गाने शक्तीपात करावा ते सद्गुरुच जाणतो .परमात्म स्वरूपात विलीन

झालेला संत सद्गुरू साधकाच्या अंतरात्म्यास पेटवतो ,जागवतो .जागा करतो .सद्गुरुने शक्तीपात केल्यावर

ती शक्ती वाढवणे हे साधकाचे काम असते .

ते तो अखंडचि आहे | मन उपाधी लक्षून पाहे | उपाधी निरासे साहे | शब्द कैसा || १५-१०-२१ ||

शब्दपर कल्पनेपर | मनबुद्धी अगोचर | विचारे पहावा विचार | अंतर्यामी ||१५-१०-२२ ||

पाहातां पाहातां कळो येते | कळले तितुके व्यर्थ जाते | अवघड कैसे बोलावे ते | कोण्या प्रकारे |\१५-१०-२३ ||

मुळात सारा अवकाश एकच आहे ,अखंड आहे .उपाधी कडे पाहून मन त्यात खंड पाडते .,भेद निर्माण करते

.त्यामुळे अखंड असणारे ,शब्दांच्या पलीकडे असणारे ,कल्पनेच्या पलीकडे असणारे ,मनाच्या बुद्धीच्या पलीकडे

असणारे ,परब्रह्म पहाण्यासाठी विवेक करावा लागतो .विवेकाने पाहू गेल्यास उपाधी नाहीशी होते ,मायीकाता

नाहीशी होते ,भेद निर्माण करणारे शब्दही नाहीसे होतात .

त्या परब्रह्माचे अखंड चिंतन केल्यास साधक निर्विकार होतो ,ज्ञानी बनतो .त्याचा देह प्रारब्धाने वावरतो

,म्हणजे त्याच्या पूर्वसंचिता नुसार ,पूर्व कर्मा नुसार त्याला भोग भोगावे लागतात ,दु:ख सहन करावे लागते

पण .त्याच्या वासना जळालेल्या असतात .त्याच्या मनात ब्रह्मविचार स्थिर झालेला असतो .

शाश्वतास शोधीत गेला | तेणे ज्ञानी साच झाला | विकार सांडूनी मिळाला | निर्विकारी ||१५-१०-२५ ||

मग तो साधक मी ब्रह्म आहे याचेच सतत चिंतन ,मनन करतो .सतत त्याचेच अनुसंधान ठेवतो

.त्यामुळे त्याचे मन स्वस्वरूपात रमते .

ध्यान करता करता मनही नाहीसे होते .वृत्ती शून्यता येते .अनुभव घेणारा ,बोलणारा ,सांगणारा सर्व लय

पावते. विकार रूपी चंचळ मागे टाकून निर्विकार पराब्र्ह्माशी मन तदाकार होते .साधक अंतरनिष्ठ होतो

Wednesday, February 2, 2011

आत्मज्ञान सर्वांना का प्राप्त होत नाही ?

आत्मज्ञान सर्वांना प्राप्त का होत नाही ?

प्रत्येकाच्या अंतरात आत्मज्ञान असते पण ते आहे हे सर्वांना कळत नाही .कारण त्या आत्मस्वरूपावर अज्ञानाचे ,मायेचे आवरण असते .ते आवरण काढून टाकण्यासाठी साधना करावी लागते .आत्मस्वरूपाचे सर्वांना भान नसते .पण प्रत्येक प्राणी त्याच्या प्रकाशात जगतो .ते स्वरूप खूप सूक्ष्म असते .सूक्ष्म बनून आपण ते पाहू शकतो .सूक्ष्म मन बनवावे लागते .त्यासाठी स्थूळाचा त्याग करावा लागतो .सूक्ष्माच्या क्षेत्रात शिरावे लागते .आपल्या अंतर्यामी जे स्वरूप आहे तेच जगाच्या अंतर्यामी आहे असा सूक्ष्म विचार करावा लागतो .प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात भेद दिसला तरी जाणीवेच्या दृष्टिने त्यांच्या दृष्टीने त्यांच्या अंतरात्म्याच्या ठिकाणी भेद नसतो .त्यामुळे ज्या जाणीवेने एका शरीराला त्याचे दु:ख कळते त्याच जाणीवेने दुस-या शरीराला त्याचे दु:ख कळते .म्हणजेच आपल्या विचारावरून दुस-याचा विचार काय आहे ते कळते .आपल्या अंतरंगावरून दुस-याचे अंतरंग कसे आहे ते ओळखते ,दुस-याच्या अंतकारणाशी तदाकार होऊन त्याचे अंतकरण् जाणावे लागते .म्हणजे दुस-याच्या अंतकारणाचे प्रतिबिंब ज्ञात्याचे अंतकरणात पडते त्यावरून दुस-याचे विचार ,भावना ,वासना ,विकार सूक्ष्मात शिरलेल्या ज्ञात्याला समजतात .त्यालाच समर्थ सूक्ष्मे सूक्ष्म समजावे असे समर्थ म्हणतात .विवेकानेच हे शक्य होते .म्हणून ज्याच्या जवळ हा बिवेक आहे तोच आत्मज्ञानी बनू शकतो .


मूळमाया विश्वरचना कशी घडवून आणते ?

मूळमाया जाणीवेची | मुळींच्या मूळ संकल्पाची |वोळखी षड्गुनैश्वराची |येणेची न्याये ||१५-७-२ ||

प्रकृती पुरुष शिवशक्ती |अर्धनारी नटेश्वर म्हणती |परी ते आवघी जगज्जोती |मूळ त्यासी |\१५-७-३ ||

संकल्पाचे जे चळण |तेंचि वायोचे लक्षण | वायो आणि त्रिगुण | आणि पंचभूते ||१५-७-४ ||

मूळमाया जाणीवेची बनलेली असते .मूळ परब्रह्मा मधील तो पहिला संकल्प होता .तो जाणीव रूप होता व तेच मूळमायेचे स्वरूप आहे .मूळ मायेची दोन रूपे आहेत .१ जाणीव २ शक्ती .जाणीवेत ऐश्वर्य ,धर्म ,यशश्री ,ज्ञान ,वैराग्य हे सहा गुण आहेत ,तोच ईश्वर आहे .शक्तिरूप आहे शारदा ! प्रकृती पुरुष ,शिवशक्ती ,अर्धनारी नटेश्वर अशी नावे तिला मूळमायेला आहेत .या सर्वांचे मूळ आहे जगज्जोती !

मूळ संकल्प म्हणजे मूळमाया म्हणजे निश्चळात चंचळ निर्माण झाले .संकल्पात चंचल निर्माण झाले .संकल्पात चंचलपण आणण्याची शक्ती म्हणजे वायू असतो .वायू त्रिगुण व पंचभूते आणतो .पण ती सूक्ष्म रूपात असतात .त्यासाठी वेलीचे रूपक सागितले आहे .वेलीवर दिसणा-या पानांचे ,फुलांचे ,फळांचे मूळ वेलींच्या मुळात असते वेलीचे रंग ,आकार ,विकार हे सर्व वेलीच्या मुळांमध्ये असतात तसे त्रिगुण व पंचमहाभूते सूक्ष्म रूपात मूळ मायेत असतात .त्रिगुण आणि पंचभूते यांच्या सहाय्याने सृष्टी निर्माण होते .वेलीचे मूळ उपटून टाकले की मग ती पून्हा उगवत नाही .तसेच मायेचे असते .मायेचे मूळ जोपर्यंत असते तोपर्यंत जन्ममृत्यू चे चक्र चालू असते .आत्मज्ञानाने मायेचे मूळ उपटले की जन्ममृत्यू आटतात .जन्म मरण उरत नाही ..आत्मज्ञानी माणसाला जन्ममृत्यूच्या फे-या घालाव्या लागत नाहीत .