Wednesday, July 28, 2010

चत्वार देव

नाना अवतार धरणे दुष्टांचा संहार करणे धर्म स्थापयाकारणे विष्णूस जन्म १० -४-४१
म्हणोन धर्मस्थापनेचे नरतेहि विष्णूचे अवतार अभक्त दुर्जन रजनीचर सहजची जाले१०-४-४२
दुष्टांचा संहार करण्यासाठी विष्णू जी मूळची शुध्द जाणीव शरीर धारण करून अवतार धारण करते .धर्माची स्थापना करण्याकरिता विष्णूला जन्म घ्यावे लागतात .त्या दृष्टीने धर्माची स्थापना करणारे विष्णूचा अवतारच असतात .श्री समर्थ म्हणतात :
धर्मस्थापनेचे नरते ईश्वराचे अवतारजाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे१८-६-२०
श्रीमद शंकराचार्य ,श्री ज्ञानेश्वर माऊली ,तुकाराम महाराज ,श्री समर्थ रामदास स्वामी ,गजानन महाराज हे सर्व अवतारच ! श्रीराम जे अवतारी पुरुष ,त्यांचे भजन ,पूजन समर्थ रामदासांनी केले त्याचा त्यांना काय फ़ायदा झाला याचे वर्णन श्रीसमर्थ करतात :
रघुनाथ भजने ज्ञान जालेरघुनाथ भजने महत्त्व वाढलेम्हानौनिया तुवां केले पाहिजे आधी६-७-३१
रघुनाथ स्मरोनी कार्य करावेते तत्काळचि सिध्दी पावेकर्ता राम हे असावे अभ्यांतरी ६-७-३३
रघुनाथाचे स्मरण केले म्हणून ज्ञान झाले ,महत्व वाढले ,सिध्दिला गेले .कर्ता करविता राम आहे ही असेल तर मुमुक्षु पद प्राप्त होते .असे होण्याचे कारण म्हणजे अवतारी पुरुषांमध्ये अंतरात्मा प्रगट होत असतो .आपण राम कृष्णांदी प्रतिमांची पूजा करतो तेव्हा ती अंतरात्म्याला पोहोचते .अंतरात्मा हे अवतारांचे नेहमी राहण्याचे ठिकाण आहे .म्हणून त्याला निजधाम म्हणतात .अवतारी स्वस्वरूपाने कायमपणे असतात .समर्थ म्हणतात :
पूजा घेताती प्रतिमाआंगा येतो अंतरात्माअवतारी ते निजधामा येऊनी गेले११-९-९
परी ते निजरूपे असती ते निजरूप ते जगज्जोती सत्वगुण तयेस म्हणती जाणती कळा ११-९-१०
विवेके बहुत पैसावले म्हणूनि अवतारी बोलिले मनु चक्रवर्ती जाले येणेची न्याये १५-३-५
विवेकाने खूप विशाल बुध्दीचे झाले ,म्हणजे मी देह नसून मी आत्मा आहे ,पुढे विश्वात्मा आहे अशी विशाल बुध्दी झाली की ते अवतारी झाले .कर्ता करविता राम आहे असा भाव झाल्यावर मुमुक्षु साधकावस्थेत जातो आणि अंतरात्मा देव असतो .

Tuesday, July 27, 2010

चत्वार देव

३३ कोटी देव मानणा-या या हिंदू धर्मात मतामतांचा गलबला आहे .प्रत्येकाला आपला देव खरा वाटतो .जोपर्यंत त्या देवाकडे मागितालेल्या मागण्या पूर्ण होतात तोपर्यंत तोच देव खरा असे मानले जाते .पण मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हा त्या देवाचा प्रभाव संपला असे लोक मानतात .श्रीसमर्थांनी खरा देव कोणता हे सांगताना चार प्रकारचे देव मानले आहेत .१}प्रतिमा २}अवतार ३}अंतरात्मा ४ }परमात्मा
चत्वार देव सांगताना समर्थ म्हणतात :
येक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी ११-२-३३
पहिल्या प्रकाराचा देव असतो प्रतिमेच्या रूपात !प्रतिमा सगुण असते पण जडरूपात असते .प्रतिमा आपल्या ईष्ट देवतेची मूर्ती असते .ती अलंकारांनी युक्त ,शस्त्र धारण करणारी ,प्रत्येक अलंकाराला,शस्त्राला विशिष्ट अर्थ असणारी अशी असते .आपण तिची पूजा करतो .प्रतिमा माती,धातू ,पाषाण या वस्तूंपासून केलेल्या असतात .या प्रतिमा म्हणजे देव अशी लोकांची कल्पना असते .त्या कल्पनेतून काय होते ते समर्थ सांगतात :
कल्पनेचा केला देव तेथे जाला दृढ़ भाव देवालागी येता खेव भक्त दु;खे दुखावला 6-६-३२
अज्ञानी माणूस कल्पनेने सगुण देव निर्माण करतो .त्याची मनापासून ,श्रद्धेने त्याची पूजा करतो .त्या देवाच्या मूर्तीला अपाय झाला तर त्याला दु ;ख होते .असा कल्पनेचा देव हरवतो ,दुष्ट माणसे त्याला फोडतात ,तुड़वतात।
तेव्हा लोक दु ;खी होतात .बाण , तांदले नाणी यांची पूजा देवघरात लोक पूजा करतात .हाच देव संकटकाळी आम्हाला पावतो ,आमच्या इच्छा पूर्ण करतो असा गैरसमज असतो .समर्थ म्हणतात :
धातु पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा तेथे देव कैचा मूर्खा भ्रांति पडली ६-६-४४
धातू पाषाण माती चित्रे लाकूड यात देव मानणे हा भ्रम आहे .असे आहे तरी सामान्य अज्ञानी जीवांनी प्रतिमा पूजन करायलाच हवे .मानव देहात परब्रह्माची प्राप्ती हे सर्वश्रेष्ठ ध्येय मानले आहे .समर्थ म्हणतात :सगुणाचेनी योगे निर्गुण पाविजे निर्धारे सगुण प्रतिमेची भाव ठेवून पूजा अर्चा केली तर ती प्रतिमा ज्या देवतेची आहे तिच्या बद्दल प्रेमभाव निर्माण होतो .सर्व कर्ता ,करविता हाच देव आहे अशी भावना निर्माण होते ..मीपणा अहंकार नाहीसा होण्यास मदत होते .मग सामान्य माणूस एक पायरी वर चढतो .आणि अज्ञानाला वाटू लागते की मला परमेश्वर भेटायला हवा .मला काहीतरी साधना करायला हवी.सद्गुरु भेटायला हवा .तेव्हा तो मुमुक्षु होतो .तेव्हा त्याचा देव होतो 'अवतार '

Monday, July 26, 2010

जगज्जोती

जसा अकाशामध्ये वायू तशी ब्रह्मामध्ये मूळमाया !त्या मूळमायेत पांच भूते व त्रिगुण सामावलेले असतात पण ते सूक्ष्म रूपात असतात निश्चल परब्रह्मात जी हालचाल होते ,जे स्फुरण असते तो वायू असतो .मूळमाया असते ।
तयामध्ये जाणीवकळा जगज्जोतीचा जिव्हाळा वायो जाणीव मिळोन मेळा मूळमाया बोलिजे १०-९-५
त्या वायू मध्ये शुध्द जाणीव असते .ती जाणीव म्हणजे जगज्जोती !म्हणून वायू आणि शुध्द जाणीव म्हणजे मूळमाया ।
वायो जाणीव जगज्जोती तयास मूळमाया म्हणती पुरुष आणि प्रकृती याचेच नाव १०-९-७
वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्जोती पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव १०-९-८
येक जाणीव वांटली प्राणीमात्रांस विभागली जाणजाणों वाचविली सर्वत्र काया १०-९-१४
तयेचे नाव जगज्जोती प्राणीमात्र तिचेनी जगती याची रोकड़ी प्रचिती प्रत्यक्ष पहावी १०-९-१५
पक्षी श्वापद किडा मुंगी कोणी येक प्राणी जगी जाणीव खेळे त्याचे अंगी निरंतर १०-९-१६
जाणोन काय पळविती तेणे गुणे वांचती दडपी आणि लपती जाणजाणों १०-९-१७
आवघ्या जगास वांचविती म्हणोनी नाम जगज्जोती ते गेलिया प्राणी मरती जेथील तेथे १०-९-१८
वायू ,जाणीव व जगज्जोती यांच्या मेळयाला मूळमाया म्हणतात .प्रकृती व पुरुष ही मूळमायेचीच नावे.पुरुष प्रकृतीला शिवशक्तीच म्हणतात .वायूमध्ये जी विशेष जाणीव आढ़ळते तोच प्रकृतीतला पुरुष होय .ज्या जाणीवेचा विष्णू झाला आहे ती जाणीव सर्व प्राणीमात्रात विभागली आहे .तिच्या प्रेरणेने प्रत्येक प्राणी समजून आपल्या देहाचे रक्षण करतो .तिला जगज्जोती म्हणतात .प्रत्येक प्राणी तिच्या मुळे जिवंत रहातो .पक्षी ,जनावरे ,किडे ,मुंग्या अशा अनेक प्राण्यात जाणीव निरंतर खेळत असते .कोणताही कठीण प्रसंग आला तर प्राणी जाणीवेने ओळखतात .तेथून पळतात,आपला जीव वाचवतात.अशा प्रकारे जाणीव निरंतर सगळ्या जगाला खेळवते ,
सांभाळते .म्हणून तिला जगज्जोती म्हणतात .ती शरीरातून बाहेर पडली की प्राणी जेथल्या तेथे मरतो .