Friday, January 2, 2009

कीर्तन भक्ती


कीर्तन
नवविधा भक्तीतील दूसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती .जे जे आपुल्यास ठावे ते ते दुस-यास सांगावे या न्यायाने आपण
जे श्रवण केलेले असते ते दस-याला सांगण्याची इच्छा होतेच .ते सांगायचे कीर्तन रूपात ,प्रवचन रूपात ।
कीर्तन हा शब्द कृत कीर्तयति या धातूपासून बनतो .कृत म्हणजे सांगणे ,स्तुती करणे,कथन करणे ,
कीर्तनाचा हेतू कीर्तन करणा-याच्या मनात भगवंताबद्दल प्रेम जागे करणे ।
कीर्तनाची तीन अंगे असतात. १ विचारांचे -भगवंताचे स्वरुप कसे ? सगुण की निर्गूण ? भक्तीचे लक्षण कोणते?ज्ञान व भक्ती यात साम्य व भेद काय ? २ प्रेमाचे -मोठ्या भक्तांची जीवन पध्दती कोणती?त्यांनी साधना कशी केली ?त्यांना अड़चणी कोणत्या आल्या ?थोर भक्तांचे चरित्र वर्णन करायचे .३ कीर्तनकाराची वैयक्तित प्रगती साधणे।
कीर्तनाची व्याख्या करताना समर्थ म्हणतात - सगुण कथा या नाव कीर्तन सगुण कथा म्हणजे देव देवतांचे ,थोर व्यक्तींचे गुणवर्णन करणे ,त्यांचे चरित्र वर्णन करणे ,त्यातून भक्ती ,ज्ञान ,सत्वगुणांचे वर्णन करणे ,अद्वैताचे
निरूपण करणे .अद्वैत म्हणजे ब्रह्म माया आत्मा यांचे निरूपण करणे ।
कीर्तनकार कसा असावा हे सांगताना समर्थ म्हणतात - वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा । अनुभवाचा हा शब्द्द महत्वाचा आहे .ज्याने खूप ज्ञान मिळवलेले आहे ,ज्याचे खूप पाठांतर आहे ,ज्याला नवीन नवीन कथा सांगण्याचा
हव्यास आहे ,त्यासाठी जो खूप कष्ट घेतो तो अनुभवी .त्याही पेक्षा महत्वाचे कीर्तनकाराने करायाला हवे -
करावे वैराग्य रक्षण । रक्षावे ज्ञानाचे लक्षण। परम दक्ष विचक्षण। सर्वही सांभाळी । । याशिवाय
तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । वित्पन्न आणि वादरहित । तरी तेही अपूर्वता । । हरिदास
म्हणजे कीर्तनकार विरक्त्त, ज्ञानी ,प्रेमळ भक्त ,वादरहित म्हणजे ज्याच्या विषयी कोणाच्याही मनात शंका
नसावी असा असावा .
कीर्तन का करावे ?
समर्थ म्हणतात - भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तने समाधान होये। नामदेव महाराज कीर्तानाला उभे रहात तेव्हा
विठ्ठलाची मूर्ती डोलत असे .उध्दव स्वामी कीर्तनाला उभे रहात तेव्हा प्रत्यक्ष मारूतीराय टाळ घेऊन उभे रहात ।
कीर्तनात काय सांगावे ?
येश कीर्ती प्रताप महिमा । आवडी वर्णावा परमात्मा । जेणे भगवद भक्तांचा आत्मा । संतुष्ट होये । ।
भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण । नीति न्याय स्वधर्म रक्षण । साधन मार्ग अध्यात्म निरूपण । प्रांजल बोलावे । ।
समोर श्रोते असतील त्याप्रमाणे त्याप्रमाणे विषय मांडावा .श्रोते साधू असतील तर अद्वैत सांगावे .भाविक श्रोते असतील तर सगुण चरित्र सांगावे .नव रसांनी युक्त कीर्तन असाव पण स्त्रियांचे रूप लावण्य वर्णन करू नये असे
समर्थ आवर्जून सांगतात .श्रोत्यांचे मन भगवंताने भारून टाकावे ।
कीर्तानाने काय होते ?
कीर्तने महादोष जाती । कीर्तने होये उत्तम गती। कीर्तने भगवत प्राप्ती । यदर्थी संदेह नाही । ।
कीर्तने वाचा पवित्र । कीर्तने होये सत्पात्र । हरिकीर्तने प्राणीमात्र । सुसिळ होती । ।
कीर्तने अवेग्रता घडे । कीर्तने निश्चय सापडे । कीर्तने संदेह बुडे । श्रोतवक्तायाचा । ।
कीर्तन कसे करावे ?
कोमल वाचेने ,कौशल्याने ,कीर्तन करावे .कर्ण कर्कश गाऊ नये .अंगात आल्यासारखे बोलू नये .भगवंताच्या
अद्भूत कीर्तीचे वर्णन करावे .कीर्तनकाराच्या मनाची स्थिती दोलायमान असू नये ।
कीर्तनपर अभंगात समर्थ म्हणतात - धन्य धन्य ते नगर । जेथे कथा निरंतर ।
गुण गाती भगवंताचे । तेची मानावे देवाचे ।